!!! सहर्ष स्वागत !!!

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ज्याची ख्याती आहे अशा ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात ब्रिटिशांच्या काळातील "ब्राह्मण सोसायटी" हि वसाहत आणि त्याच काळात स्थापन झालेली "हितवर्धिनी सभा" हि संस्था आजही आपला सांस्कृतिक वारसा जपून आहेत. त्यावेळच्या ब्रिटिशकालीन रेल्वेत काम करणाऱ्या काही मध्यमवर्गीय मंडळींनी एकत्र येऊन १९३१ साली ब्रिटिश सरकारकडून नऊशे नव्याण्णव वर्षांच्या भाडेतत्वावर जमीन घेऊन नौपाडा विभागात चव्वेचाळीस प्लॉट्सच्या "ब्राह्मण सोसायटी" या निवासी वसाहतीची स्थापना केली. येणाऱ्या पिढ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा आणि त्यांच्यात साहित्य, क्रीडा व संस्कृती यांविषयी रुची निर्माण व्हावी या हेतूने प्रेरित होऊन ब्राह्मण सोसायटीच्याच सभासदांपैकी काही मंडळींनी, ज्यांत प्रामुख्याने "कै. श्री. हरी कृष्ण पेंडसे", "कै. श्री. नीळकंठ श्रीधर गणपुले", "कै. श्री. सदाशिव मोरेश्वर गोगटे", "कै. श्री. रघुनाथ गोविंद मुळे", "कै. श्री. रघुनाथ लक्ष्मण मुळे", "कै. श्री. नारायण पांडुरंग शेवडे", "कै. श्री. रामकृष्ण गोविंद काटदरे", "कै. श्री. रामचंद्र कृष्णाजी कानडे", "कै. श्री. बाळकृष्ण गणेश नवरंगे", "कै. श्री. मोरेश्वर नारायण बिवलकर" या मान्यवरांनी १९३३ सालच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नौपाडा येथे "हितवर्धिनी सभेची" स्थापना केली.

जसे छोट्या रोपट्याचे विस्तीर्ण वृक्षात रूपांतरण होते तसेच हितवर्धिनी सभेच्या कार्यकक्षा आजमितीस प्रचंड विस्तारल्या आहेत; त्यात प्रामुख्याने उमा-नीळकंठ व्यायामशाळा, वीर सावरकर वाचनालय आणि श्री हनुमान मंदिर येतात. हितवर्धिनी सभेच्या स्थापनेबरोबरच उमा-नीळकंठ व्यायामशाळा आणि श्री हनुमान मंदिर यांची स्थापना झाली. अगदी टपरीवजा आणि दगडी घुमटीत स्थापन झालेले, अनुक्रमे व्यायामशाळा आणि हनुमान मंदिर, आज स्वतंत्र जागेत कार्यरत आहेत. संस्थेच्याच विस्तीर्ण प्रांगणात नव्याने उभारलेल्या इमारतीमध्ये कालांतराने सुरु झालेले वीर सावरकर वाचनालय आज सुसज्ज आणि नामांकित वाचनालयांपैकी एक म्हणून ओळखले जाते. अनेकविध विषयांवरील पुस्तके, दर्जेदार साहित्य आणि वाजवी सभासद शुल्क यांमुळे अल्पावधीतच सावरकर वाचनालय ब्राह्मण सोसायटी आणि परिसरात प्रसिद्ध झाले आहे. संस्थेच्या उमा-नीळकंठ व्यायामशाळेत अत्याधुनिक उपकरणांबरोबरच प्रशिक्षित आणि मान्यताप्राप्त व्यायामशिक्षक आहेत.

नुकतेच संस्थेने त्यांच्या सभागृहाचे नूतनीकरण केले. संपूर्ण वातानुकूलित आणि उत्तम ध्वनीक्षेपक यंत्रणा व ओव्हरहेड प्रोजेक्टरने सज्ज असे हे सभागृह छोटेखानी समारंभ, परिषदा, मंगळागौर, साखरपुडा, विवाह समारंभ यांसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आले आहे. सभागृहाबरोबरच संस्थेचे भव्य पटांगण देखील चर्चासत्रे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी उपलब्ध आहे. हितवर्धिनी सभेचे कार्य हे नेहमीच साहित्य, क्रीडा आणि संस्कृती या त्रिसूत्रीवर आधारित होते. त्यामुळे, साहित्याची देवाण-घेवाण, मैदानी खेळांत रुची वृद्धी आणि संस्कृतीची जोपासना यांसाठी अत्यंत वाजवी दरांत सर्व उपक्रम राबवले जातात.

उमाश्री सारखी शरीरसौष्ठव स्पर्धा, हनुमान जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा यांसारख्या कार्यक्रमांतून आजही संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. उत्तमोत्तम नाटके, संगीताचे कार्यक्रम, कीर्तने, चर्चासत्रे, उत्कृष्ट वक्त्यांची भाषणे अशा कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या माघी गणेशोत्सवाची सर्वानाच उत्सुकता असते. शतकाकडे वाटचाल चालू असलेल्या संस्थेचे ठाण्यात आज अग्रक्रमाने नाव घेतले जाते. लोकाभिमुख व राजकारणापासून अलिप्त असलेल्या हितवर्धिनी सभेचे कार्य आज ठाणे शहरात सर्वश्रुत आहेच, पण सांस्कृतिक कार्यांत देखील एक अग्रेसर संस्था म्हणून सभेचा नावलौकिक आहे.