!!! श्री हनुमान मंदिर !!!

आज अस्तित्वात असलेली श्री हनुमानाची मूर्ती संस्थेचे एक संस्थापक, कै. सदाशिवराव गोगटे यांचे घराच्या आवारात, वास्तूचे खोदकाम करताना सापडली होती. काही काळ वास्तुतच तिची स्थापना केली होती. पुढे, हितवर्धिनी सभेच्या स्थापनेनंतर, हनुमान मंदिराच्या उभारणीसाठी, सदाशिवरावांनी हि मूर्ती देऊ केली. हितवर्धिनी सभेच्या स्थापनेनंतर, १९३४ साली श्री. तेरेदेसाई यांनी सभेच्या मोकळ्या जागेत एक नवे देऊळ बांधून त्यांत मारुतीरायाची पुनर्स्थापना केली. सन १९५६ - १९५९ या कालावधीत, संस्थापकांपैकी एक, कै. रामकृष्ण गो. काटदरे यांनी मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले. कै. दि. पु. आठवले यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने नागरिकांकडून स्वयंस्फूर्त देणग्या मिळवून मंदिरापुढील सभामंडप पूर्ण केला व देऊळ प्रदक्षिणेचीही सोय केली. या कार्यात कै. दादासाहेब काटदरे यांनी अतिशय परिश्रम घेऊन निधी संकलनाचे काम केले.

मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. कै. रामभाऊ सहस्रबुद्धे यांनी १९५९ पासून सलग दहा वर्षे उत्सवासाठी आर्थिक सहाय्य केले, त्याचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कालांतराने, मंदिराची बरीच पडझड झाल्याने, सन १९७८ मध्ये मारुती मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्याचे ठरले व १९८२ साली नवीन स्वरूपात, सध्या उभे असलेले देऊळ बांधून पूर्ण झाले. या उभारणीसाठी श्री. चंद्रसेन शेवडेश्री. हेमंत भाटवडेकर यांनी अथक प्रयत्न केले.

मंदिरात मान्यवर व्यक्तींची कीर्तने, प्रवचने, भजने इ. कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात. या मंदिराचे निमित्ताने वाचस्पती क्षीरसागर यांची प्रवचने, पंचांगकर्ते कै. धुंडिराजशास्त्री दाते यांची भाषणे, तसेच गोविंदस्वामी आफळे, कल्याणबुवा रामदासी या राष्ट्रीय कीर्तनकारांची कीर्तने लोकांना ऐकायला मिळाली आहेत. दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त संपूर्ण मंदिरात पणत्या लावून मंदिर उजळले जाते.