!!! उमा निळकंठ व्यायामशाळा !!!

तरुण वर्गाला आरोग्यदृष्ट्या सुदृढ करण्यासाठी, त्यांच्यात व्यायामाची गोडी निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम व्यायामशाळेची इमारत बांधणे नितांत गरजेचे होते. त्या दृष्टीने संस्थापक सभासदांनी सोसायटीला लागूनच असलेली जमीन, "द्वारकादास रतनसी लोहाणे ठक्कर" यांजकडून खरेदी केली व तेथेच सुरुवातीला एक पत्र्याची टपरी बांधून व्यायामशाळा सुरु झाली. मारुतीची उपासना म्हणजेच शक्तीची उपासना! व्यायामशाळेला लागूनच दगडी घुमटीत संस्थापक सदाशिवराव गोगटे यांजकडील हनुमानाची मूर्ती स्थापण्यात आली.

पत्र्याच्या टपरीत सुरु झालेल्या व्यायामशाळेचे आणि घुमटीत स्थापन झालेल्या हनुमान मंदिराचे पक्क्या वास्तूत स्थलांतर होणे आवश्यक होते. गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व "कै. नीळकंठ ठाकूर" यांनी रु. १५००/- ची देणगी संस्थेस दिल्यानंतर, व्यायामशाळेचे आणि श्री हनुमान मंदिराचे बांधकाम करण्यात आले. श्री. ठाकूरांच्या इच्छेनुसार व्यायामशाळेला त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव देण्यात येऊन "उमा-नीळकंठ व्यायामशाळा" अस्तित्वात आली.

सुरुवातीच्या काळात कुस्ती खेळण्यासाठी व्यायामशाळेत लाल मातीचा आखाडा बनविला होता. १९३९ ते १९५१ या काळात श्री. गणा दातारश्री. वासुदेवराव उर्फ वासू फडके हे व्यायामासाठी व्यायामशाळेत येत असत. ते विद्यार्थ्याना मार्गदर्शनही करत. प्रसिद्ध व्यायामपटू श्री. तळवलकर यांचे भाचे कै. श्री. र. खं. लघाटे हे त्याच सुमारास ठाण्यात राहण्यास आले होते. श्री. लघाटे हे देखील एक उत्तम व्यायामपटू होते. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा संस्थेला आणि व्यायामशाळेला फायदा मिळावा या हेतूने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी देखील होकार देत पुढे अनेक वर्षे व्यायामशिक्षक म्हणून काम पाहिले. व्यायामशाळेच्या उर्जितावस्थेत श्री. लघाटे यांचे महत्वाचे योगदान आहे. लघाटे मास्तरांच्या काळात व्यायामशाळेत अनेक सुधारणा झाल्या. त्यांनी लहान-मोठ्या मुलांचा एक गट तयार करून त्यांचेकडून डबलबार, सिंगलबार, पिरॅमिड, लेझीम, बॅलन्सिंग ट्रॅपीझ इ. प्रात्यक्षिके तयार करून घेतली. त्याचे अनेक ठिकाणी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम देखील झाले.

व्यायामशाळेत आजपर्यंत अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. "उमाश्री" सारख्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आजपर्यंत अनेक व्यायामपटूंनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत पारितोषिके जिंकली आहेत. कालानुरूप पूर्वीचा मातीचा आखाडा आता बंद झाला असला तरी व्यायामशाळेची नवीन वास्तू अत्याधुनिक उपकरणांनी आणि तितक्याच पात्र प्रशिक्षकांनी सुसज्ज आहे.